बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६

एका कलेवराचा आनंदशोध

 


मी आनंदी सुखी....ही भावना घेऊन वाळलेल्या वृक्षावरील एका पाखराचे हे आत्मकथन असल्याचे किशोर कडू या चित्रकाराने मनोजचे मनोज्ञ बोबडे बोल कुशलतेने मुखपृष्ठावर चित्रित केले आहे. ‘मी आनंदी सुखी’ या मनोज बोबडे यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्याच पानावर बालपणात साक्षीदार-भागीदार ठरलेल्या तीन गावातील समस्त सान-थोरास हे पुस्तक समर्पित केले आहे. त्यात संत तुकारामांची पडछाया दाखवून त्यांच्या ‘मी आनंदी सुखी...’ ही पुस्तकाची नाममुद्रा त्याखाली ठळकपणे उमटविली आहे. यावरून मनोजचा प्रेरणास्त्रोत कळून येतो.

       पुस्तकाचे प्रकाशक मा. संजय गोडे ह्यांच्या आग्रहाने हे धक्कादायक व धाडसी सत्य असलेले आत्मवृत्त प्रकाशात आले ही जमेची बाब आहे. अवघ्या सदतीस वर्षाच्या वयात प्रारंभीच्या सतरा वर्षातील निरागसता, अलवारपणा व अलमस्तपणा आणि नंतरच्या वीस वर्षातील शारीरिक अपंगत्वातील परावलंबी जीवघेणी अस्वस्थता या सर्वांचे प्रत्ययकारी चित्रण मनोजने समर्थ व हृदयस्पर्शी शब्दातून मांडले आहे. डॉ. आ. ह. साळुंखे सर या सत्शील व संतहृदयी महान विद्वानाच्या प्रस्तावनेने मुळातच मौलिक असलेल्या या चरित्राला अधिक अलंकृत केले आहे.

मनोजने जे काही या आत्मकथनात लिहिले ते त्याने आयुष्यात घडलेले प्रामाणिकपणे नमूद केले आहे. यामुळे त्याच्या या आत्मवृत्ताची जातकुळी महात्मा गांधी यांच्या आत्मकथेशी जुळणारी आहे. तसेच डॉ. अभय बंग, सर्च शोध ग्राम पो. जि. गडचिरोली ह्यांच्या ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या पुस्तकाचीही यानिमित्ताने आठवण होते. कुष्ठरोगावर मात करून सेवेचे जीवन जगत असलेले सुधाकर कडू सर, आनंदवन वरोरा यांचे ‘मी एक आनंदयात्री’ हे संस्मरणात्मक पुस्तकही माझ्या नजरेसमोर येते. तसे तर प्रत्येक व्यक्ती ही या जगात ‘युनिक’ असते. निसर्गाने एकाच छापाच्या दोन व्यक्ती निर्माण केल्याचे शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे मनोज बोबडे म्हणजे मनोज बोबडेच!

       मनोजसारख्या युवावस्थेत पदार्पण करणाऱ्या मुलाची ही आपबिती कल्पनेच्या पलीकडचे एक महाभयंकर वास्तव आहे. त्याने जो दुःखाचा पर्वत पेलला त्याला तोड नाही. त्या अचाट दुःखातही त्रयस्थपणे जगाकडे पाहून त्याने सत्याचा शोध घेतला त्याची व या सत्यशोधनाच्या साधनेस इतरांना प्रवृत्त करणारी निवेदन शैली या आत्मकथेत दिसून येते.

परिस्थितीचे वार झेलून

परिस्थितीवर स्वार व्हावं

अशा स्वारांना पुढ जायला

आपण उघडलेलं दार व्हावं

  या माझ्या चारोळीचा आशय मनोजच्या जीवनसंघर्षाला व त्याच्या तत्वज्ञानाला लागू पडतो.

       आत्मकथा सादर करताना मनोजने आपल्या आई-वडिलांचा वंशवृक्ष दर्शवून स्वतःच्या आयुष्यातील घटनात्मक अनुक्रमाने उलगडत नेला आहे. ग्रामीण भागातील त्याचे बालपण, शिक्षण, कुटुंबीय मंडळी, आप्त, मित्र ह्यांची माहिती दिली. त्याने बालसुलभ बऱ्या-वाईट घटना प्रांजळपणे मांडल्या. सामाजिक व्यवस्था, श्रध्दा-अंधश्रध्दा, संगतीचे परिणाम, मनात रुजत गेलेले अनावश्यक भावगंड, उद्भवलेला आजार, आजाराची परमसीमा, कलेवराचे रूप घेतलेले शरीर, त्याचे परावलंबित्व, आई-वडील-भाऊ-बहिण ह्यांची मिळालेली साथ, त्याने सकारात्मकतेने स्वीकारलेला भयाण दुःखभोग या सर्वांचे वर्णन वाचून दगडी मनालाही करुणेचा पाझर फुटल्याशिवाय राहत नाही.

       मनोज हा शारीरिकदृष्ट्या उध्वस्थ झालेला असला तरी तो साधारण श्रेणीतला तरुण नसून तो एक कलावंत, विचारवंत, आचारवंत व जीवनात सत्याची सुंदरता शोधून ती अनुभवणारा एक उच्च कोटीतला सुहृदय माणूस असल्याचे ही आत्मकथा सांगते. त्याच्या कथनात अहंकाराचा-मोठेपणाचा लवलेशही नाही. भोगत-उपभोगत असलेल्या व जगत असलेल्या जीवनाकडे तटस्थपणे बघून त्याने कृतज्ञतेच्या भावनेतून ठिकठिकाणी विनम्रता प्रकट केली आहे. त्याने चित्रकलेची व कलाकुसरीची सुंदर कामेही केली आहे.

       त्याच्या आजारपणात त्याने जीवनोपयोगी विविधांगी वाचन वाढविले. त्याच्या बहुश्रुतपणातून व आलेल्या कडू-गोड अनुभवातून त्यास अभिव्यक्त व्हावसं वाटलं. यातूनच त्याच्यातला साहित्यिक जागृत झाला. त्याच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होऊन निसर्गाप्रतीची ओढ वृध्दिंगत झाली. मानव हा निसर्गाचा घटक असून ईश्वर, देव, देव-देवता, आत्मा-परमात्मा, स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, अंधश्रध्दा इ. ची त्याच्या मनावरील जळमटे गळून पडली. नैसर्गिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आदि जीवनमुल्यांच्या आनंद साधनेकडे वळून आनंदी बनण्याचा व इतरांनाही आनंदी होण्याचा पुरस्कार तो करीत आहे.

       आपल्या जीवनकथेत मनोजने सर्वांकडून झालेल्या चुका उघड केल्या. स्वतःकडून, पालकांकडून, मित्रांकडून, समाजाकडून, धर्ममार्तंडाकडून घडत गेलेले प्रमाद सांगून त्यातून मुक्त होण्याची आवश्यकता त्याने कथन केली. बालकांवर चांगले संस्कार होण्याची गरज त्याने प्रकर्षाने प्रतिपादन केली. आज घडत गेलेल्या मनोजच्या जीवनशिल्पाच्या पाठीशी तुकारामादी संताचे सत्यदर्शी विचार तथा अनेक विचारवंतांचे व महात्म्यांचे मनोभाव कारणीभूत आहेत. महात्मा बुध्दांच्या एका वाक्याने तर मनोजची वैचारीकताच बदलून गेली. व जीवनाला नवी दिशा मिळाली. ते वाक्य असे,

‘’कुणी महापुरुष सांगतात म्हणून, कुणी गुरु सांगतो म्हणून, कोणते धर्म वा धर्मग्रंथ सांगतात म्हणून, कुणी आप्त सांगतात म्हणून ते खरे मानू नका तर ते निरखून-पारखून पडताळून पाहिल्यावर सत्य म्हणून समोर आल्यावर स्वीकारा!’’

               अशाप्रकारे स्वतःची घडण करीत धडपडणाऱ्या मनोजने डोके आणि मानस स्वच्छ, सुंदर, निर्भय आणि निश्चित झाल्याचे तो अनुभवित आहे. स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, प्र. के. अत्रे, डॉ. आ.ह.साळुंखे सर, प्रा. श्याम मानव व अन्य परिवर्तनवादी महानुभाव व विज्ञानवादी-मानवतावादी चळवळींच्या विचारांनी त्याच्या मनाचे पोषण केले आहे.

       मनोजने साहित्यिक प्रांतात प्रवेश करून साहित्यिक अपत्यांना जन्म दिला आहे. ‘परिमळ’, ‘वेध अंबराचा’, ‘व्हीलचेअर’, ‘टिमटिमणाऱ्या चांदण्या’ ई. त्यांची नावे आहेत. यातून त्याचा अनेक साहित्यिकांशी वावर वाढला. कविवर्य सुधाकर गायधनींनी त्याच्या साहित्य निर्मितीचा गौरव केला. त्याने त्यांच्या संपर्कातील साहित्यिकांचा आपुलकीने उल्लेखही केला आहे.

       एकंदरीत ही आत्मकथा आबाल-वृध्दांना प्रेरणादायी ठरणारी आहे. ‘एका कलेवराचा आनंदशोध’ यातून प्रतीत झाला आहे. तसेच मनोजला जोपासणारे, जगवणारे त्याचे आई-बाबा-भाऊ-बहिण ह्यांच्या सेवामय त्यागासही मी सलाम करतो. अन्य आप्त-मित्रांचा सद्भावही खूप मोलाचा आहे यात शंका नाही. वाळलेल्या वृक्षावरील मनोजरुपी पाखराची ही विस्मयकारी आयुष्यकथा आणखी नवनव्या उड्डाणांनी समृध्द होवो हीच माझी सदिच्छा!   

 

  -ना. गो. थुटे
  वरोरा. जि.-चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एका कलेवराचा आनंदशोध

  मी आनंदी सुखी....ही भावना घेऊन वाळलेल्या वृक्षावरील एका पाखराचे हे आत्मकथन असल्याचे किशोर कडू या चित्रकाराने मनोजचे मनोज्ञ बोबडे बोल कुशलत...